Friday, July 1, 2011

अंतर्नाद-२

हेवा करु नये म्हणतात, पण एकाच जागी स्थिर अशा तुकोबा तुमच्या मनाचा हेवा वाटतोय!’ ’आता कोठे धावे मन’ म्हणत एकरंगी न्हाऊन निघणार्‍या त्या मनाचा हेवा.. प्रेम, राग, अभिमान सगळं एका सावळ्या रंगात विरघळवून टाकणारा नाद कुठे मिळाला तुम्हाला? सुख मिळावं म्हणून अजिजी नाही, दुःख मिळालं, म्हणून नाराजी नाही.. एका भक्तीवाटेवरच ठिय्या! काळ्या मूर्तीवरचे चमकते दागिने, पाणी सांडणारे मोती दिसले नसतील तुम्हाला कधीच.. पण काळ्या नजरेत खोलवर पाहिल्यावर एक थंड, शांत असे काहीतरी नक्कीच जाणवले असेल. आम्हाला कधी दिसायचे हो ते सगळे?

भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद ।
हे ऎकूनही का हेवा वाटू नये? कैक तपांचा शीण गेला. अंतरात एकच प्रकाश उरला. तो प्रकाश स्वतःचा आहेही आणि नाहीही. आतून आलेली शांतता, आनंद, निरिच्छ लय सगळंच! तुमच्या आनंदाचा तुकडा म्हणून अभंग दिलेत आम्हाला.. पोळलेल्या मनाला हेही बरेच काही आहे. अनंत वाटा फुटणारे रस्ते आम्हाला गोंधळवून टाकतात. नवरसांच्या भुलभूलैय्यात पार चक्रावल्यासारखं होतं. हा मनाचा दहावा रस कुठून शोधून काढलात तुम्ही? वेताळाच्या गोष्टीतली पात्रे शेवटी युक्तीने कोणाच्यातरी माथी आपल्यावरच्या चक्राच्या वेदना सुपूर्त करतात. अशीच, अस्वस्थतेच चक्र घेऊन फिरणारी आधुनिक शापित पात्रे आम्ही.. काय युक्ती करणार? पण तुमचे अभंग आम्हाला मोकळं मोकळं करतात. सगळीच्या सगळी वर्षे खर्ची घालावी लागली तरी, शेवटी ’भाग गेला शीण गेला ’ हे अनुभवायला मिळावं असा आशिर्वाद द्याल का?

2 comments:

  1. अप्रतिम निव्वळ..
    अंतर्नाद अभंगांचा..आणि किती आशय आले त्यास.. खूप आवडलं!

    ReplyDelete