Friday, January 7, 2011

Sixth Happiness

माझ्या अतिशय आवडत्या लेखिका शांता शेळके यांच्या ’पावसाआधीचा पाऊस’ या पुस्तकामधला हा लेख. प्रस्तावनेत त्यांनी लिहलेय, त्यांनी ’डिलाइट’ हे पुस्तक वाचले होते. त्यात लेखकाने स्फुट लेख लिहलेले होते. पण त्याची लांबी ठराविक नव्हती. काही लेख दोनतीन पानांचे, काही पानभर, तर काही चार ओळींचेच! त्यातला एक लेख होता-

’सकाळची वेळ. मी माझ्या अभ्यासिकेत बसलो आहे, खिडकीपाशी, आणि समोर निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर चर्चचे तीन मनोरे दिसत आहेत.’

इतका छोटा लेख. श्री.म.माटे म्हणत," काही अनुभव बचकेने उचलायचे असतात तर काही चिमटीने." त्या वाचनाने कल्पना मुक्त, स्वैर आणि लवचिक झाल्या.
तर, त्यातील त्यांच्या ’सहावे सुख’ या लेखाचे हे संक्षिप्त रुप-

चिनी लोकांमध्ये म्हणे एक गोड प्रथा आहे. दोन चिनी माणसे एकमेकांना भेटली म्हणजे आपल्याप्रमाणे तीही परस्परांचे अभीष्टचिंतन करतात. हे चिंतन करताना ’तुम्हाला सहा सुखे मिळोत’ असे ते म्हणतात. यातली पाच सुखे सामान्यतः कुणालाही आयुष्य़ात हवीशी वाटतील अशीच आहेत. ती म्हणजे आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगली पत्नी, चांगली मुले. अभीष्टचिंतनात या पाच सुखांचा अंतर्भाव करणे योग्यच आहे. पण मग हे सहावे सुख कोणते? चिनी माणसाचे वेगळेपण जाणवते ते इथे. त्याच्या कल्पनेप्रमाणे हे सहावे सुख ज्याचे त्यालाच कळायला हवे असते. आणि ते सुख समोरच्या माणसाला सापडावे, लाभावे असे अभीष्टचिंतन करणारा म्हणत असतो.
ही सहाव्या सुखाची कल्पना किती वेगळी. किती अर्थपूर्ण आहे! आपले आयुष्य सुखासमाधानात जावे यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्यांची जाणीव सगळ्यांनाच असते. आणि म्हणून आपण जन्मभर त्या गोष्टींच्या मागे जीव तोडून धावत असतो. पण आयुष्य केवळ येवढ्याने परिपूर्ण होत नाही. त्यासाठी आणखी काहीतरी हवे असते हे चिनी माणसाला अंतःप्रेरणेने कळलेले आहे आणि म्हणूनच त्याने हे सहावे सुख गृहीत धरले आहे.
एक गृहस्थ. पन्नाशी उलटलेले. पेन्शनीकडे झुकत चाललेले. त्यांनी एके दिवशी एक गुरु गाठला. त्यांच्याकडून गंडा बांधून घेतला आणि गाणे शिकायला सुरवात केली. गाणेही कसे? हलकी फुलकी भावगीते वगैरे नव्हे, थेट शास्त्रिय संगित. कामावरुन आल्यावर रोज तंबोरा हाती घेऊन शास्त्रशुध्द संगित सुरु. मित्रांनी त्यांच्या या नादाची चेष्टा, टिंगल केली, पण हा गृहस्थ चिडला नाही, त्याने शांतपणे दोस्तांना सांगितले,
"मला गळा नाही. साता जन्मांत कधी गाता येणार नाही. मग या वयात मोठा गायक बनण्याची गोष्ट दूरच. मला हे न कळण्याइतका मी मूर्ख आहे असं का तुम्हाला वाटतं? पण बरेच दिवस हे स्वप्न मला छळत होतं.शेवटी ठरवलं, ते काही नाही, आपण गाणं शिकायचयं, अन त्यात वाईट काय आहे सांगा, माझ्या छंदाचा कुणाला उपद्रव होत नाही. वेळ माझा जातो, पैसा माझा जातो, श्रम मला पडतात. त्यात कुणाच काय गेलं?"
मंडळी निघून गेली, गृहस्थ शांतपणे तंबोरा छेडत राहिले. याची चाहूल कुणाला, केव्हा, कधी अन कुठे लागेल ते सांगणे कठीण आहे.
केशवसुत म्हणतात-

चुकल्याचुकल्यापरि
होउनि अंतरि
बघे बावरी
माझे मज लाभेल कसे?
परि न हरपले ते गवसे.

केशवसुतांचे हे ’हरपले श्रेय’ म्हणजे चिनी माणसाच्या कल्पनेतले अज्ञात सहावे सुखच होय. गोकुळातला बाळकृष्ण जवळच कुठे तरी लपून बसायचा. त्याला शोधून शोधून यशोदामाई रंजिस आली, रडवेली झाली, की मग तो एकदम धावत येऊन तिच्या कमरेला मिठी मारायचा. खदाखदा हसायचा. आणि त्याला ह्रदयाशी कवटाळता यशोदेला पुरेवाट व्हायची. आपले सहावे सुख असेच कुठेतरी जवळच लपून बसलेले नाही ना, याचा माणसाने मधून मधून शोध घ्यावा. न जाणो, कुठल्या क्षणी येऊन ते आपल्याला मिठी मारेल!

लेखिका- शांता ज. शेळके
---------------------------------------------------------

योगायोग आहे, पण आत्ता हे टंकताना शुभा मुदगलचे ’बैरी चैन’ वाजत आहे.. या गाण्यात आणि लेखात बर्‍याच गोष्टी समान आहेत. :)

किस गलीमें कौनसे डगर आएगा कब ये चैन?
किस घडीमें कौनसे पहर आएगा कब ये चैन?

3 comments:

  1. kaay lihu g...khup chhan lihile aahes...apratim !!

    ReplyDelete
  2. थॅंक्स योगेश,

    माऊताई, शांताबाईंचे लिखाण खरंच साधे तरी किती खोल आहे ना? हेच शेअर करावेसे वाटले..

    ReplyDelete