Wednesday, January 5, 2011

अंतर्नाद

१) "तू अ‍ॅल्युमिनिला जाणार?"
"हो मग! माझा ड्रेस पण ठरलाय"
"मला नाही जमणार"
"तुला फोटो दाखवेन मी"
"तुला सगळे भेटतील. मज्जा!"
"तो सुध्दा येईलच! मोठ्ठ भांडण झाल्यापासून बोलणंच झालं नाही. पण यावेळी येईल बोलायला. चूक त्याचीच होती. मी नुसते तोंडदेखलं हाय बाय म्हणून निघून जाईन. तो कदाचित सॉरी म्हणेल, मग आय डोन्ट नो मी काय म्हणेन, पण.. फारच सॉरी सॉरी म्हणू लागला तर बघू.."
"जमके तयारी आहे!"
"यप!"
"हॅलो पियू, कशी झाली पार्टी?"
"ठिक"
"तो आला होता का?"
"हो"
"मग, त्याच्यासमोर भाव खाल्लास की नाही?"
"...."
"हॅलो.."
"त्याने मला ओळखही दाखवली नाही गं.."
"ओह! सॉरी.."
":("
------------------------------------------------------------------------

२)  दत्ताच्या अभिषेकासाठी मंदिरात जायचे आहे. मला ऎन थंडीत भल्यापहाटे उठवले गेले आहे. स्वेटर, शाल लपेटूनही जाणवणारा गारवा.. चपला जिथे काढल्यात, तिथून मुख्य दारापर्यंत अनवाणी चालत जावे लागते. बोचरी थंडी, अधून मधून टोचणारे दगड, झोपाळू डोळे, अंधार आणि यामुळे आलेला थोडा वैताग घेऊन मी आत जाते. आतले वातावरण उबदार आहे. छान प्रसन्न वाटते. तासाभर अध्यात्माचा उहापोह होतो. आपल्याला त्या शक्तीची ओळख झाली आहे असा भ्रम होतो. नंतर यथासांग पूजा होते, आरती होते. भरगोस प्रसाद घेऊन आम्ही बाहेर पडतो. अजूनही पूर्ण फटफटलेले नाही. स्तोत्रांचा नाद कानात आहेच. बाहेर रस्त्यावर भिकार्‍यांची रांग बसली आहे. त्यांना मंदिराच्या आवारात बसायची परवानगी नाही. एक नाणे पुढच्या थाळीत टाकून मला पटकन पुढे जायचे आहे. थंडी आहे, दगड टोचताहेत.. शेवटच्या रांगेतली वृध्द स्त्री मला हाक मारते. मलाच का? तिला टाळून जायचा प्रयत्न. माझ्या कानात स्तोत्रे आहेत ना, ती तशीच रहावीत म्हणून मी वेगाने चालत जाते. ती शेवटपर्यंत पहात राहते. शेजारच्या टपरीवरचा चहावाला त्या सगळ्यांच्या पेल्यात चहा ओततोय. कितीही.. त्यांनी ’आणि जरा घाल’ म्हटले तर, आणखीनही! फुकट! त्या बाईचे चहाकडे लक्ष नाही. चपला शेजारीच पडल्यात, पण मी मुद्दामच त्या घालत नाही. तिच्या दिशेने मागे जाते. गार पायाला खडे जास्त टोचतात. टोचू देत! तिच्या थाळीत दोन चार नाणी जास्त पडतात माझ्याकडून, तरी माझे संकोचलेपण कमी होत नाही. ती मान डोलावून माझ्यावरुन नजर हटवते तेव्हा सुटलेपणाची भावना होते. आता मी शाल जास्त घट्ट पांघरुन घेतली आहे. थंडीमुळे नव्हे, मला खरचं कुठेतरी आत आत निघून जायचयं!
--------------------------------------------------------------------------

काही गोष्टी आपल्याला खूप लवकर जमिनीवर आणतात.

2 comments:

  1. really, things never leave a chance to..

    ReplyDelete
  2. सोप्या शब्दात,(आपल्या आणि इतरांच्या बाबतीतला)भ्रमाचा भोपळा फुटतो.

    ReplyDelete