Sunday, January 2, 2011

कोनाडा

तुला मी कधीच पाहिलं नाही. तरी दरवेळी तू मला भेटत होतीस. पणजीला पाहण्याच (तेही कळत्या वयात) भाग्य खूप कमी लोकांना मिळत. आणि मी तशीही लकी वगैरे कधीच नव्हते. तुझ्या माझ्यातलं साम्य हा माझ्या तुझ्याबद्दलच्या कुतुहलाचा भाग होताच, पण आणखीही काही गोष्टी निगडीत होत्या. सकाळी विस्कटलेल्या केसांनी, पायमोडक्या बाहुलीला हाताशी धरुन दाराच्या चौकटीत मी उभी असायची म्हणे.. आई सांगायची. आणि या शेंबड्य़ा ध्यानाकडे बघून आजी म्हणायची, " या सासूबाई! आजची कामं सांगा!!" मी मठ्ठासारखी तशीच उभी.. आज्जी मला सासूबाई म्हणते आहे हे पाहून आई खो खो हसायची.. दरवेळी, तेवढच! तेही आठवत नाही मला, पण सासूबाई म्हटलेले आठवते आहे. बर्‍याच वेळा आज्जीची मिश्कील नजर आणि आबांची प्रेमळ नजर; तोलमोल करता यायचे नाही. आबांची "आई गं माझी" म्हणून मारलेली हाकही मला सगळ्य़ा नातवंडांपासून स्पेशल ट्रीटमेंट देऊन जायची.
घराच्या बांधकामात जुन्या चोपड्य़ांच्यामधे कोपरे गेलेला फोटॊ मिळाला होता तुझा! अलवणातली पणजी.. गोरीगोमटी, शांत डोळ्यांची.. किंचीत अवघडून पहात बसलेली. तुझ्याविषयी ऎकलेल्या गोष्टीत एकच बाब परत येत होती.. "शब्दानेही कुणाला दुखावले नाही हो आज्जीने.. गाय होती अगदी! पोरासोरांचे करुन, आल्यागेल्यांचे बघून, राबत असायची दिवसभर! फार मायाळू होती बघ तुझी पणजी.. " तुझी माया अजून पोहोचते आहे.. आज राहून राहून न पाहिलेल्या अलवणातल्या पणजीची आठवण होते आहे. काही अस्वस्थ तास तिने गोंजारुन मऊ मऊ करुन टाकले असते. कोनाड्यात दुपारी ठेवलेला खास खाऊ काढून हातावर टिकवला असता. गावातल्या जुन्या गोष्टी सांगून घटकाभर गुंगवून ठेवले असते. नुसते जवळ बसूनही मन शांत स्वस्थ केले असते.
तुझ्या माझ्यात किंचित साम्य असेलही, पण आबांच्या ’आई’ या हाकेला मी पात्र नाहीच. त्यावेळी फुशारकी मारली असेल, पण आज जाणवतयं, तो किती मोठा बहुमान होता.  तुझी नेहमीच आठवण येत राहील गं पणजीआज्जी.. एकदा आपली भेट व्हायला हवी होती!

5 comments: