Saturday, January 29, 2011

Victim 1

लाँग डिस्टन्स कॉल्स ज्यादातर रातकोही आते है
उस रातभी आया था..
दिनभर सोचके रखा था उसने
उसको ये कहूँगा, वो बताऊँगा
शिकायतें जो चुभ रही थी कुछ दिनोंसे
उसे मख़मलसे ढ़क दूँगा..
"मैं यहाँ ख़ूष हूँ; वापस नही आऊँगी,
अलग होनाही ठिक है, गुडबाय"
उसे लगा, जो सुना वो शायद उसकी कल्पना है
लेकीन ख़यालोंमेंभी कभी इस बातने दस्तक नही दी; फिर?
थरथराते हाथोंमें फोन लेकर वो बैठा रहा
और देखता रहा उसकी तरफ़ कितनी देर..
किसी करीबवालेकी मौतकी ख़बर लेकर आए
इन्सानकी तरफ देख़ रहा हो जैसे..
सही बात है, किसीका ख़ून करनेके लिए
रुबरु होना जऱुऱी नही होता...

Thursday, January 27, 2011

Victim

दर्दके साएँ आँखोमें लेकर

कितने दिनों बाद घरसे बाहर निकला था वो

राहें तो वही पड़ी पड़ी सो रही थी

वो उनकी नींदे कुचलकर चल रहा था

बीचमेंही कही मुड़ जाता था

जैसे करवट ले ली हो नींदमें

थके पैरोंने रुकनेकी इज़ाज़त माँगी,

तो रुक गया वो..

सामने देखा, मंदीर था, भीड़ थी

दुख़ियारे मन को चैन की जरुरत थी

उसने भगवानको कोसा, ख़ुदको कोसा,

कुछ खोखली आँहे भरी और टिका लगाकर बाहर निकला

किसी पहचानवालेने हाथ हिलाया

तो रुकना पड़ा उसे

"अरे भैय्या, सुना है तेरी बेटी किसी के साथ भाग गई,

कैसे हुआ? माज़रा क्या है?"

जिसके जवाब वो ख़ुद जानना चाहता था

वो सवाल उसके सर चढ़कर बोलने लगे

आँखोंमें दर्द के साएँ औरभी गहरे हो गएँ

वो इतना चूप रहा जैसे उसकी मौत हो गई हो

ख़ुलेआम मंदीरके सामनेभी

लोग कितनी आसानीसे ख़ून कर देते है...

Tuesday, January 11, 2011

दवाओंने असर दिखने की जरुरत है  अब,
दुवाँओंके मानी बढ़ाने की जरुरत है अब,

बड़ी जख़्मी साँसे चलती है आजकल..

Saturday, January 8, 2011

गर्दी

पहाटेची वेळ आहे. फिरायला बाहेर पडलेली काही वृध्द लोकं, दूधवाले आणि फुलांच्या टोकरी घेऊन जाणार्‍या स्त्रिया आहेत. तलावाच्या काठी स्थलांतरीत पक्षी दिसतात. दाट धुकं दिसतं आणि मनातले विचार दिसतात. इतका कोलाहल सहन होत नाही आजकाल!


(डिलाईट इफेक्ट! :))

Friday, January 7, 2011

Sixth Happiness

माझ्या अतिशय आवडत्या लेखिका शांता शेळके यांच्या ’पावसाआधीचा पाऊस’ या पुस्तकामधला हा लेख. प्रस्तावनेत त्यांनी लिहलेय, त्यांनी ’डिलाइट’ हे पुस्तक वाचले होते. त्यात लेखकाने स्फुट लेख लिहलेले होते. पण त्याची लांबी ठराविक नव्हती. काही लेख दोनतीन पानांचे, काही पानभर, तर काही चार ओळींचेच! त्यातला एक लेख होता-

’सकाळची वेळ. मी माझ्या अभ्यासिकेत बसलो आहे, खिडकीपाशी, आणि समोर निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर चर्चचे तीन मनोरे दिसत आहेत.’

इतका छोटा लेख. श्री.म.माटे म्हणत," काही अनुभव बचकेने उचलायचे असतात तर काही चिमटीने." त्या वाचनाने कल्पना मुक्त, स्वैर आणि लवचिक झाल्या.
तर, त्यातील त्यांच्या ’सहावे सुख’ या लेखाचे हे संक्षिप्त रुप-

चिनी लोकांमध्ये म्हणे एक गोड प्रथा आहे. दोन चिनी माणसे एकमेकांना भेटली म्हणजे आपल्याप्रमाणे तीही परस्परांचे अभीष्टचिंतन करतात. हे चिंतन करताना ’तुम्हाला सहा सुखे मिळोत’ असे ते म्हणतात. यातली पाच सुखे सामान्यतः कुणालाही आयुष्य़ात हवीशी वाटतील अशीच आहेत. ती म्हणजे आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगली पत्नी, चांगली मुले. अभीष्टचिंतनात या पाच सुखांचा अंतर्भाव करणे योग्यच आहे. पण मग हे सहावे सुख कोणते? चिनी माणसाचे वेगळेपण जाणवते ते इथे. त्याच्या कल्पनेप्रमाणे हे सहावे सुख ज्याचे त्यालाच कळायला हवे असते. आणि ते सुख समोरच्या माणसाला सापडावे, लाभावे असे अभीष्टचिंतन करणारा म्हणत असतो.
ही सहाव्या सुखाची कल्पना किती वेगळी. किती अर्थपूर्ण आहे! आपले आयुष्य सुखासमाधानात जावे यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्यांची जाणीव सगळ्यांनाच असते. आणि म्हणून आपण जन्मभर त्या गोष्टींच्या मागे जीव तोडून धावत असतो. पण आयुष्य केवळ येवढ्याने परिपूर्ण होत नाही. त्यासाठी आणखी काहीतरी हवे असते हे चिनी माणसाला अंतःप्रेरणेने कळलेले आहे आणि म्हणूनच त्याने हे सहावे सुख गृहीत धरले आहे.
एक गृहस्थ. पन्नाशी उलटलेले. पेन्शनीकडे झुकत चाललेले. त्यांनी एके दिवशी एक गुरु गाठला. त्यांच्याकडून गंडा बांधून घेतला आणि गाणे शिकायला सुरवात केली. गाणेही कसे? हलकी फुलकी भावगीते वगैरे नव्हे, थेट शास्त्रिय संगित. कामावरुन आल्यावर रोज तंबोरा हाती घेऊन शास्त्रशुध्द संगित सुरु. मित्रांनी त्यांच्या या नादाची चेष्टा, टिंगल केली, पण हा गृहस्थ चिडला नाही, त्याने शांतपणे दोस्तांना सांगितले,
"मला गळा नाही. साता जन्मांत कधी गाता येणार नाही. मग या वयात मोठा गायक बनण्याची गोष्ट दूरच. मला हे न कळण्याइतका मी मूर्ख आहे असं का तुम्हाला वाटतं? पण बरेच दिवस हे स्वप्न मला छळत होतं.शेवटी ठरवलं, ते काही नाही, आपण गाणं शिकायचयं, अन त्यात वाईट काय आहे सांगा, माझ्या छंदाचा कुणाला उपद्रव होत नाही. वेळ माझा जातो, पैसा माझा जातो, श्रम मला पडतात. त्यात कुणाच काय गेलं?"
मंडळी निघून गेली, गृहस्थ शांतपणे तंबोरा छेडत राहिले. याची चाहूल कुणाला, केव्हा, कधी अन कुठे लागेल ते सांगणे कठीण आहे.
केशवसुत म्हणतात-

चुकल्याचुकल्यापरि
होउनि अंतरि
बघे बावरी
माझे मज लाभेल कसे?
परि न हरपले ते गवसे.

केशवसुतांचे हे ’हरपले श्रेय’ म्हणजे चिनी माणसाच्या कल्पनेतले अज्ञात सहावे सुखच होय. गोकुळातला बाळकृष्ण जवळच कुठे तरी लपून बसायचा. त्याला शोधून शोधून यशोदामाई रंजिस आली, रडवेली झाली, की मग तो एकदम धावत येऊन तिच्या कमरेला मिठी मारायचा. खदाखदा हसायचा. आणि त्याला ह्रदयाशी कवटाळता यशोदेला पुरेवाट व्हायची. आपले सहावे सुख असेच कुठेतरी जवळच लपून बसलेले नाही ना, याचा माणसाने मधून मधून शोध घ्यावा. न जाणो, कुठल्या क्षणी येऊन ते आपल्याला मिठी मारेल!

लेखिका- शांता ज. शेळके
---------------------------------------------------------

योगायोग आहे, पण आत्ता हे टंकताना शुभा मुदगलचे ’बैरी चैन’ वाजत आहे.. या गाण्यात आणि लेखात बर्‍याच गोष्टी समान आहेत. :)

किस गलीमें कौनसे डगर आएगा कब ये चैन?
किस घडीमें कौनसे पहर आएगा कब ये चैन?

Thursday, January 6, 2011

अंतर्नाद -१

एका मित्राच्या वैचारिक गोंधळाचे हे अभिसरण..
गोंधळ हा म्हटलं तर युनिव्हर्सल फिनोमेनन, पण प्रत्येकाच्यात कमी अधिक प्रमाणात सापडणारा.. विकी मध्ये perception ची व्याख्या आहे, "The word "perception" means "action of taking possession, apprehension with the mind or senses." अतिविचाराचे पर्सेप्शन आपण पाहू तसे आहे, की अतिविचार हेच पर्सेप्शन आहे? एकामागून एक विचार possession घेत जातात हे बाकी खरे आहे.

ग्राफिक्समधला Orthographic Projection प्रकार मला फार आवडायचा. एकाच ऑब्जेक्टचे तिन व्ह्यू दाखवायचे. टॉप व्ह्यू अगदी सोपा, साईड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू. दैनंदिन कामातही याच प्रोसेसची गरज असते का? ज्या गोष्टी सोप्या आहेत, त्या आपण तशाच राहू देतो का? प्रत्येक वेळी त्याचे त्रिमितीय गणित मांडणे आवश्यक असते का? माहित नाही. पण बरेच लोकं मांडतात. क्षुल्लक गोष्ट आहे पण मला गंमत वाटली, एका मैत्रिणीला मोठ्या आकाराच्या औषधांच्या गोळ्यांचा फोबिआ आहे. घरी जाताना तिला दुकानातून गोळ्या घेऊन जायचे होते.

" मी त्या केमिस्टला कसे सांगू, मला याच गोळ्या हव्यात, पण लहान आकाराच्या.."
" मला आत्ता जसे सांगितलेस तसेच "
" तो काय म्हणेल? विचित्र नजरेने बघेल "
" मग एकदा मोठ्या आकाराच्या गोळ्या घेऊन बघ! खोकला मोठा म्हणून, मोठा आकार दिला असेल!"

तिने दुकानात काही सांगितलेही नाही, आणि औषध घेऊही शकली नाही. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल यात स्वतःला काय हवे आहे हेच समजेनासे होते. दुसर्‍या बाजूने; व.पुं.चा मालवणकर त्यांनी सांगितला तसाच असेल काय? मनस्वी राहणे ही नुसती कवीकल्पना तर नाही? नक्कीच नाही. अवघड गोष्टी जराश्या बाजूला ठेऊन सोपी सुरवात करायला माझ्या एका काकांना जमले आहे. जंगलाची, संशॊधनाची प्रचंड आवड! प्रखर बुध्दीमत्ता आणि वेगळे काहीतरी करण्याची उर्मी त्यांचे आयुष्यच आगळेवेगळे करुन गेली. लग्नानंतर लठ्ठ पगाराची नोकरी सोडताना झालेला गोंधळ शेवटचाच! ते म्हणाले होते,

"मला काय हवे आहे हे मी जेव्हा स्पष्ट पाहू शकलो, तेव्हाच ठरवले, पाहिजे आहे त्यावर पुन्हा पुन्हा विचारांचा भडीमार करत राहिलो तर यातून कधीच बाहेर पडणार नाही. मला सगळी सगळी जंगलं पहायचीत, वेगवेगळी माती खणून त्यावर संशॊधन करायचेय! आणि मला घरही सांभाळायचेय!"

आजही ते संशॊधक म्हणूनच काम करताहेत. दिवसांचे तास त्यांना पुरत नाहीत. आणि हे स्वतःपुरत पाहणं नाहीय! इथे परत आपण Over Thinking च्या loop मधे जातो. बर्‍याच गोष्टी परिस्थितीवर अवलंबून असतात. 
तर, टोमॅटोचे सार असे आहे की, मित्रा, फाsर फाsर विचार करत जाऊ नकोस. तुला ज्या गोष्टी स्पष्ट वाटतात, त्या मान्य कर की स्पष्ट आहेत. Acceptance हा वैचारीक गोंधळावरचा फार मोठा उतारा आहे. आणि close वर क्लिक करणे हा ब्लॉग बंद करण्यावरचा उतारा आहे.
बर्‍याच गोष्टींना इलाज असतो. (पण माझ्या प्रवचनाला इलाज नाही :D)

Wednesday, January 5, 2011

अंतर्नाद

१) "तू अ‍ॅल्युमिनिला जाणार?"
"हो मग! माझा ड्रेस पण ठरलाय"
"मला नाही जमणार"
"तुला फोटो दाखवेन मी"
"तुला सगळे भेटतील. मज्जा!"
"तो सुध्दा येईलच! मोठ्ठ भांडण झाल्यापासून बोलणंच झालं नाही. पण यावेळी येईल बोलायला. चूक त्याचीच होती. मी नुसते तोंडदेखलं हाय बाय म्हणून निघून जाईन. तो कदाचित सॉरी म्हणेल, मग आय डोन्ट नो मी काय म्हणेन, पण.. फारच सॉरी सॉरी म्हणू लागला तर बघू.."
"जमके तयारी आहे!"
"यप!"
"हॅलो पियू, कशी झाली पार्टी?"
"ठिक"
"तो आला होता का?"
"हो"
"मग, त्याच्यासमोर भाव खाल्लास की नाही?"
"...."
"हॅलो.."
"त्याने मला ओळखही दाखवली नाही गं.."
"ओह! सॉरी.."
":("
------------------------------------------------------------------------

२)  दत्ताच्या अभिषेकासाठी मंदिरात जायचे आहे. मला ऎन थंडीत भल्यापहाटे उठवले गेले आहे. स्वेटर, शाल लपेटूनही जाणवणारा गारवा.. चपला जिथे काढल्यात, तिथून मुख्य दारापर्यंत अनवाणी चालत जावे लागते. बोचरी थंडी, अधून मधून टोचणारे दगड, झोपाळू डोळे, अंधार आणि यामुळे आलेला थोडा वैताग घेऊन मी आत जाते. आतले वातावरण उबदार आहे. छान प्रसन्न वाटते. तासाभर अध्यात्माचा उहापोह होतो. आपल्याला त्या शक्तीची ओळख झाली आहे असा भ्रम होतो. नंतर यथासांग पूजा होते, आरती होते. भरगोस प्रसाद घेऊन आम्ही बाहेर पडतो. अजूनही पूर्ण फटफटलेले नाही. स्तोत्रांचा नाद कानात आहेच. बाहेर रस्त्यावर भिकार्‍यांची रांग बसली आहे. त्यांना मंदिराच्या आवारात बसायची परवानगी नाही. एक नाणे पुढच्या थाळीत टाकून मला पटकन पुढे जायचे आहे. थंडी आहे, दगड टोचताहेत.. शेवटच्या रांगेतली वृध्द स्त्री मला हाक मारते. मलाच का? तिला टाळून जायचा प्रयत्न. माझ्या कानात स्तोत्रे आहेत ना, ती तशीच रहावीत म्हणून मी वेगाने चालत जाते. ती शेवटपर्यंत पहात राहते. शेजारच्या टपरीवरचा चहावाला त्या सगळ्यांच्या पेल्यात चहा ओततोय. कितीही.. त्यांनी ’आणि जरा घाल’ म्हटले तर, आणखीनही! फुकट! त्या बाईचे चहाकडे लक्ष नाही. चपला शेजारीच पडल्यात, पण मी मुद्दामच त्या घालत नाही. तिच्या दिशेने मागे जाते. गार पायाला खडे जास्त टोचतात. टोचू देत! तिच्या थाळीत दोन चार नाणी जास्त पडतात माझ्याकडून, तरी माझे संकोचलेपण कमी होत नाही. ती मान डोलावून माझ्यावरुन नजर हटवते तेव्हा सुटलेपणाची भावना होते. आता मी शाल जास्त घट्ट पांघरुन घेतली आहे. थंडीमुळे नव्हे, मला खरचं कुठेतरी आत आत निघून जायचयं!
--------------------------------------------------------------------------

काही गोष्टी आपल्याला खूप लवकर जमिनीवर आणतात.

Tuesday, January 4, 2011

नमकीन गाणं

हे असंच अर्धवट कधीतरी मागे एकदा लिहून ठेवलं होतं. जरा ठिकठाक करुन पोस्टत आहे. गजाली हे दाखवायचे दात आहेत आणि हा खायचे... :)  इकडे काहीही चालतं!

एखादी गोष्ट पिच्छा सोडत नाही, तेव्हा त्याचा राग येतो, आश्चर्य वाटते, कधी गंमतही वाटते. मांजर पायात घोटाळत असल्यासारखं.. काही महिन्यांपूर्वी एका गाण्याच्या ओळींनी असाच ताबा घेतला होता. नमकीन चित्रपटातल ’फिरसे आय्यो’ हे गाणं.. आर.डी.बर्मनच संगित आणि आशा भोसलेंचा परिपक्व जाणता आवाज. मिठ्ठू ही मुलगी स्वप्नाळू, वेगळ्या विश्वात राहणारी आहे. थोडी थंडी, थोडे ढग लपेटून घेत ती हिमाचल प्रदेशातल्या दर्‍याखोर्‍यात फिरत गाणं म्हणते. हिच गाणं म्हणताना दाखवण ही सोपी गोष्ट नाही कारण मिठ्ठू मुकी असते. गाण्यातही तिचे ओठ हलत नाहीत. ती आपल्या मनाने गाते आणि त्याचा आनंद, ते भाव तिच्या (शबाना आजमी) चेहर्‍यावर उमटत राहतात. अशा अबोलीला आवाज द्यावा आशाबाईंनीच!तर, पिच्छा न सोडणार्‍या ओळी होत्या याच गाण्याच्या आणि त्यातल्या त्यात पुढच्या कडव्याने विशेष खूष केले होते.

"तेरे जानेकी रुत मै जानती हू 
मूड़के आनेकी रीत है के नही?
काली दरगासे पूछूंगी जाके
तेरे मनमें भी प्रित है के नही?"

PS- प्रिय गुलजार, आम्ही तुमच्या कैदेत आहोत आणि नेहमीच राहू!

Monday, January 3, 2011

पारिजात

ओळीतली चांगली सहा सात घरं सोडून आठवं घरं श्रीमंत आहे. निदान तेव्हातरी तसंच वाटायचं. त्या घराच्या दारातच प्राजक्ताचं झाड होतं. कधी उकाड्या रात्री पश्चिमेहून येणारा वारा, गार वगैरे नसायचा, पण मी जरा वाहतेय.. असं सांगत येणारी हवा मस्त सुवास घेऊन यायची. दिवसाची किचकीच, अस्वस्थ घटकेच्या रेषा पुसून टाकणारा सुवास.. पश्चिमगंध म्हणजे पारिजाताचा वास हे समिकरण म्हणूनच डोक्यात बसलं असाव!
उगाचच मागे एकदा ऎकलेल्या सावंत सरांच्या भाषणातली काही वाक्ये आठवायची. अर्थाअर्थी काही संबंध नसेलही असेलही . " तुम्ही विचार करता त्यापेक्षा जे आहे ते खूप वेगळ आहे. बहुतेक आपल्या कक्षेबाहेरच. ते आपल्याला समजत नाही, पकडता येत नाही म्हणून खंत बाळगायचे काहीच कारण नाही.आपण आत्ता जे जगतोय ते चांगल्या प्रकारे, कधी मजेशीर पध्दतीनेही अनुभवायला हवयं. मी योग शिकवतो म्हणजे इथे येवून कवायतच करायची आहे असे नाही. तो तुम्ही अनुभवा.. याची सुरवात छोट्या छोट्या गोष्टींपासून करा. "
सुवास अनुभवायला त्या पारिजातने शिकवले. मंद घटकेच्या शांत अनुभवाला सुरवात करुन दिली. बागेतून येणारा वेगवेगळ्या पानांचा वासही आसपास असायचाच. पण हा दरवळ वेगळा जाणवतच राहिला.
कालौघात झाड दोनदा अर्धे कापले गेले. तरी परत जमेल तसे फुलत गेले. आता पूर्वीइतका सडा नाही पडत. बागेतल्या पानांचा वास प्रखर वाटतो. या वेगळ्या मंद वासाची रांगोळी आता अंगणात नाही उमटत.. आणि तसेही ते घरही आता श्रीमंत राहिले नाहीय!

Sunday, January 2, 2011

कोनाडा

तुला मी कधीच पाहिलं नाही. तरी दरवेळी तू मला भेटत होतीस. पणजीला पाहण्याच (तेही कळत्या वयात) भाग्य खूप कमी लोकांना मिळत. आणि मी तशीही लकी वगैरे कधीच नव्हते. तुझ्या माझ्यातलं साम्य हा माझ्या तुझ्याबद्दलच्या कुतुहलाचा भाग होताच, पण आणखीही काही गोष्टी निगडीत होत्या. सकाळी विस्कटलेल्या केसांनी, पायमोडक्या बाहुलीला हाताशी धरुन दाराच्या चौकटीत मी उभी असायची म्हणे.. आई सांगायची. आणि या शेंबड्य़ा ध्यानाकडे बघून आजी म्हणायची, " या सासूबाई! आजची कामं सांगा!!" मी मठ्ठासारखी तशीच उभी.. आज्जी मला सासूबाई म्हणते आहे हे पाहून आई खो खो हसायची.. दरवेळी, तेवढच! तेही आठवत नाही मला, पण सासूबाई म्हटलेले आठवते आहे. बर्‍याच वेळा आज्जीची मिश्कील नजर आणि आबांची प्रेमळ नजर; तोलमोल करता यायचे नाही. आबांची "आई गं माझी" म्हणून मारलेली हाकही मला सगळ्य़ा नातवंडांपासून स्पेशल ट्रीटमेंट देऊन जायची.
घराच्या बांधकामात जुन्या चोपड्य़ांच्यामधे कोपरे गेलेला फोटॊ मिळाला होता तुझा! अलवणातली पणजी.. गोरीगोमटी, शांत डोळ्यांची.. किंचीत अवघडून पहात बसलेली. तुझ्याविषयी ऎकलेल्या गोष्टीत एकच बाब परत येत होती.. "शब्दानेही कुणाला दुखावले नाही हो आज्जीने.. गाय होती अगदी! पोरासोरांचे करुन, आल्यागेल्यांचे बघून, राबत असायची दिवसभर! फार मायाळू होती बघ तुझी पणजी.. " तुझी माया अजून पोहोचते आहे.. आज राहून राहून न पाहिलेल्या अलवणातल्या पणजीची आठवण होते आहे. काही अस्वस्थ तास तिने गोंजारुन मऊ मऊ करुन टाकले असते. कोनाड्यात दुपारी ठेवलेला खास खाऊ काढून हातावर टिकवला असता. गावातल्या जुन्या गोष्टी सांगून घटकाभर गुंगवून ठेवले असते. नुसते जवळ बसूनही मन शांत स्वस्थ केले असते.
तुझ्या माझ्यात किंचित साम्य असेलही, पण आबांच्या ’आई’ या हाकेला मी पात्र नाहीच. त्यावेळी फुशारकी मारली असेल, पण आज जाणवतयं, तो किती मोठा बहुमान होता.  तुझी नेहमीच आठवण येत राहील गं पणजीआज्जी.. एकदा आपली भेट व्हायला हवी होती!