Monday, November 23, 2009

ग्रे

दोन आठवडे झाले, त्रिवेणी नक्की मागवतो म्हणून मेहता बुक सेलर्सने सांगितले होते. ही तिसरी खेप. का आणत नाहीये तो?  खरचं Shortage असेल का?  मग शि.द. फ़डणीसांच पुस्तकही मिळत नाहीये म्हणाला. आणि ’ महाभारतील व्यक्तीरेखा’ पुस्तकाविषयी विचारले तर चक्क नाक उडवून हसला मेला!
नोव्हेंबरमधे पाऊस? छ्या, मोठ्या मुश्कीलीने सकाळी फ़िरायला जायचं कोष्टक बसवल होत. आता परत ओमsफ़स!! ते फ़िरायचे बर्‍याच दमड्या मोजून घेतलेले बूट तब्बल एक वर्षांनी काढले तेव्हा, घरच्यांनी चेष्टा करण्यात जाम हात धुवून घेतले होते. आता परत ते सगळी वाक्‌सुमने ऎकावी लागणार!
घरी सुट्टीचे दीड दोन दिवस कसे पट्कन जातात. मग ऑफ़िसमध्ये दिवस आजकाल ढकलावा का लागतो?  जाड्या Desktop कॉंप्युटर कडे बघायचाही वैताग येतो, मग नाविन्यपूर्ण वगैरे काम तर दूरच!
कधीनव्हे तो थिएटरला पिक्चर पाहिला तो पण All the Best ! ह्याची शिफ़ारस करणार्‍याला धरुन गदागदा हलवावे, तर तो परदेशात! हॅरी पॉटर-६ मिस झाल्याचे शल्य काही भरुन निघाले नाही.
या सारेगमचा एक कंटाळा आलाय. परिक्षकांचे आणि माझे गुणही मिळत नाहीयेत.
आईने माझ्याच तुंबलेल्या कामांची ही मोठी माळ टाकली. एकही अजून पूर्ण नाहीये. वर आणि माझं राशीभविष्यही चांगल छापून येत नाहिये.
आणि  हा काय तक्रारनामा लिहलाय पाच मिनिटातं? छ्या बुवा..!